मुंबई: मुंबईच्या पूर्व भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरू माँ ज्योती म्हणून ओळखली जाणारी ट्रान्सजेंडर महिला लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू होती. तिच्या घरी दररोज शेकडो भक्त दर्शनासाठी यायचे व आशीर्वाद घ्यायचे. पण या महिलेबाबत पोलीस तपासात खळबळजनक माहिती उघड झाली असून सदर महिला ही एक बांगलादेशी नागरिक असून गेली तब्बल 30 वर्ष ती भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबईतील शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरु माँ हिचं खरं नाव बाबू अयान खान असून तिने स्वतःला भारतीय नागरिक म्हणून दाखवण्यासाठी बनावट जन्म प्रमाणपत्र, आधार आणि पॅन कार्ड तयार करून ठेवले होते. मात्र पोलिसांनी ही कागदपत्रं पडताळणीसाठी पाठवली तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं आणि सगळी कागदपत्रं बनावट असल्याचं आढळलं.
आरोपी महिलेनं मुंबईतील गोवंडीतील रफीक नगर भागात तब्बल 20 घरे खरेदी केली होती. या घरांमध्येच ती आपल्या सुमारे 300 अनुयायांसोबत धार्मिक विधी व आशीर्वाद सत्रे घेत असत. लोक तिच्या कथित दिव्य शक्तीवर विश्वास ठेवून मोठ्या रकमाही अर्पण करत असत. पण पोलिसांच्या मते, ही धार्मिकतेचा आधार घेऊन सुरू असलेली एक मोठी फसवणूक साखळी होती.
एटीएस युनिटने 24 मार्चला रफीक नगरमध्ये छापा टाकला असता 8 बांगलादेशी ट्रान्सजेंडर व्यक्ती अटकेत आल्या. त्यावेळीच ज्योतीवर संशय आला होता. तिने भारतीय नागरिक असल्याचा दावा करत बनावट कागदपत्रं दाखवली होती. पण पुढील तपासात सत्य बाहेर आलं आणि नुकतीच ज्योतीला अटक करण्यात आली. तिच्याविरोधात पासपोर्ट कायदा 1950, फॉरेनर्स ऑर्डर 1948, फॉरेनर्स ॲक्ट 1946 आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत () गुन्हे दाखल झाले आहेत. शिवाजी नगर, नर्पोली, देवनार, ट्रॉम्बे आणि कुर्ला ठाण्यांमध्ये तिच्याविरोधात याआधीच पाच गुन्हे नोंदवले गेले होते.